गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.
याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व शेतीपद्धती मधील वाढत्या रासायनिक निविष्ठांच्या उपयोगामुळे आज समस्त मानवजातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. भारतात २०२२ साली १४.६१ लाख लोकांमध्ये कर्करोगाचे निदान झाले आणि ज्या लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचू शकल्या नाही तो आकडा वेगळाच. सरकारी आकड्यांनुसार उत्तरेकडील पंजाब या राज्यात दर दिवसाला १८ लोकांचा मृत्यू हा कर्करोगामुळे होतो. चंदीगड येथील नामांकित इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल एडुकेशन अँड रिसर्च च्या माहितीनुसार कीटकनाशकांचा अतिवापर हे वाढत्या कर्करोगाचे एक मुख्य कारण आहे. याचसोबत पंजाब राज्यातील बरेच गोड्या पाण्याचे स्रोत सुद्धा रासायनिक निविष्ठांच्या अतिवापराने दूषित झाले आहे. पंजाबमधील दोन जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले असता त्यात क्लोरोपायरीफॉस, हेप्टाक्लोर सारखे कीटकनाशक आणि इतर रसायन आढळून आले, ज्यामुळे तिथे कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. तसेच नायट्रेट्स आणि इतर रसायनांमुळे काही स्रोतातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये अशी सूचनासुद्धा केल्या गेली आहे. या सर्व घडामोडींच्या मागे कारण म्हणजे १९६० च्या दशकात पंजाब राज्यात उत्पादन वाढीच्या हेतूने शेती पद्धतीमध्ये हरित क्रांतीचा अवलंब करण्यात आला होता . या पद्धतीमध्ये संकरित बियाणे, रासायनिक खते आणि इतर निविष्ठांचा वापर करून उत्पादन वाढ हि प्राथमिक असते आणि शाश्वत शेती किंवा शाश्वतरित्या संसाधनांचा वापर हे दुय्यम असते. पृथीवरील एकूण हरितगृह वायू (Greenhouse Gases) उत्सर्जनात शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा वाटा हा ५% आहे.सोबतच अश्या पद्धती वापरून तयार झालेलं अन्न आपल्या पोषणाच्या गरजा पूर्ण करत नाही हे पण सिद्ध झालेलं आहे. एकदा अन्न सुरक्षा यातून मिळवता येईल पण पोषण सुरक्षेसाठी पुन्हा इत्तर गोष्टींवर अवलंबून राहावं लागेल. अन्न आणि पोषण सुरक्षा हे सोबत-सोबत मिळवणे हा आदर्श इथे साध्य होत नाही. सोबतच रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे होणारे आजार, अतिवापराने होणारी जीवितहानी यामध्ये होणार खर्च आणि मानवी कामाचे तास याचे प्रमाण भरपूर आहे. यातून एकच निष्कर्ष निघतो की रासायनिक निविष्ठांच्या आधारित शेतीव्यवस्था ज्यात नैसर्गिक संसाधनांचा आणि ऊर्जेचा अवाजवी वापर होतो, ती व्यवस्था मानवजातीला आणि या पृथ्वीला फार काळ तारू शकणार नाही.
सेंद्रिय किंवा नैसर्गिक किंवा ऍग्रोइकोलॉजी या शेतीपद्धतीमध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर हा निसर्गाच्या नियमांशी सुसंगतरित्या केला जातो. यामुळे निसर्गातील विविध जीव-भूरासायनिक, पोषण द्रव्ये, अन्नसाखळी आणि इतर क्लिष्ट साखळ्यांना बाधा पोहचत नाही. परिणामी, निसर्गाची हानी न होता त्याचे संवर्धन होते व सोबतच सुरक्षित आणि शाश्वत अन्नाचे उत्पादन सुद्धा होते. निसर्गाच्या नियमांत ढवळाढवळ न केल्याने आणि रसायनांचा वापर न केल्याने तयार झालेलं अन्न हे पोषकतत्त्वाच्या बाबतीत संपन्न असते आणि आपल्या बऱ्याच गरज त्यातून पूर्ण होते. सध्या प्रचलित असलेल्या आणि गरज असलेलं समग्र फ्रेमवर्क म्हणजे "वन हेल्थ". जागतिक आरोग्य संघटनेच्या परिभाषेनुसार "वन हेल्थ" हे मानत की पृथ्वीतलावरील समस्त जीव-जंतूंचे आरोग्य हे महत्त्वाचे आणि एकमेंकावर अवलंबून असून त्यात सुरक्षित आणि निरोगी अन्नाचा एक मोठा वाटा आहे. समग्रपणे विचार केल्यास आज सेंद्रिय शेती व्यवस्था, सेंद्रिय शेतमालाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मर्यादित नैसर्गिक साधने असल्याने आज शाश्वत शेतीव्यवस्थेशिवाय आपण खराखुरा विकास करू शकत नाही.
Comments
Post a Comment