मी मुख्य नागपुर शहरापासून दहाएक किलोमीटर दूर राहतो आणि हे अंतर तसं बघितलं तर फार नाही आहे. अगदी माझ्या बालपणापासून दळणवळणाची साधने पण मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आधी एसटीचा लाल डब्बा , नंतर स्टार बस व सोबतीला आटोरिक्षा यांची बरीच रेलचेल सुरुवातीपासूनच असायची. अंतराबद्दल बोलायच झालं तर नागपूरमधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय माझ्या घरापासून अगदी ८०० मीटर अंतरावर आहे , वैद्यकीय महाविद्यालय ५ किंलोमीटर अंतरावर आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालय हे ८ किलोमीटर अंतरावर आहे. ही सगळी अंतरे सांगण्यामागचे कारण असे की ही वेगवेगळी अंतरे आपल्याला फार वाटत नाही आणि इतक्या कमी अंतरामुळे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये खूप काही फरक पडणार नाही असा बहुतेकदा आपला समज असतो. दहावीचा निकाल हातात येईपर्यंत डॉक्टर व्हायच असेल तर अकरावी ला प्रवेश घ्यायचा आणि अभियांत्रिकीकडे जायच असेल तर तंत्रविद्यानिकेतन( Polytechnic) ला प्रवेश घ्यायचा यापलीकडे काहीच माहित नव्हतं. अभियांत्रिकी ला राज्यस्तरीय महाविद्यालये वेगळे , राष्ट्रस्तरीय वेगळे आणि नंतर आई.आई.टी( IIT) वेगळे आणि...