रंगांच्या संचामधे काळ्या आणि पांढर्या रंगांना कमालीचे महत्त्व असते. दोन्ही रंग हे स्वतः मधे परिपूर्ण असून त्यांचे एक वेगळे भावनिक आणि लाक्षणिक अस्तित्व आहे. या दोन्ही रंगांचा स्वभाव मात्र एकमेकांच्या अगदी उलट. पांढरा रंग हा शांतता , शुद्धता , सुरक्षितता , प्रकाश , सज्जनता अश्या विविध बाबींचा प्रतीक आहे. तर दुसरीकडे काळा रंग हा गूढ , रहस्य , संताप , कुरापत , अधिकार , भय , शक्ती असल्या विविध बाबींचा प्रतीक मानला जातो. या दोन्ही रंगातील आणि त्यांचा गुणधर्मातील तफावत ही अगदी उघड , स्पष्ट आणि प्रकर्षाने जाणवणारी आहे. त्यामुळे या दोन्ही रंगांच्या बाबतीत संभ्रमात पडणे हे अतिशय कठीण. काळ्या आणि पांढर्या रंगां मध्ये असंख्य अश्या विविध राखाडी छटा येतात. या छटांमध्ये काळ्या आणि पांढर्या दोन्ही रंगांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. एखाद्या छटेमध्ये पांढरा रंग वरचढ असतो तर दुसर्या छटेमध्ये काळा रंग हा वरचढ असतो. याच धर्तीवर मानवी स्वभाव आणि समाज पण विविध छटांनी रंगलेला असतो. कुठलीच व्यक्ति आणि त्या व्यक्तीचा स्वभाव हा एकाच बाबीने परिपूर्ण असेल असे होत नाही. स्वभावातील आणि आय...