Skip to main content

रंग माझा राखाडी

रंगांच्या संचामधे काळ्या आणि पांढर्‍या रंगांना कमालीचे महत्त्व असते. दोन्ही रंग हे स्वतः मधे परिपूर्ण असून त्यांचे एक वेगळे भावनिक आणि लाक्षणिक अस्तित्व आहे. या दोन्ही रंगांचा स्वभाव मात्र एकमेकांच्या अगदी उलट. पांढरा रंग हा शांतता, शुद्धता, सुरक्षितता, प्रकाश, सज्जनता अश्या विविध बाबींचा प्रतीक आहे. तर दुसरीकडे काळा रंग हा गूढ, रहस्य, संताप, कुरापत, अधिकार, भय, शक्ती असल्या विविध बाबींचा प्रतीक मानला जातो. या दोन्ही रंगातील आणि त्यांचा गुणधर्मातील तफावत ही अगदी उघड, स्पष्ट आणि प्रकर्षाने जाणवणारी आहे. त्यामुळे या दोन्ही रंगांच्या बाबतीत संभ्रमात पडणे हे अतिशय कठीण.

काळ्या आणि पांढर्‍या रंगां मध्ये असंख्य अश्या विविध राखाडी छटा येतात. या छटांमध्ये काळ्या आणि पांढर्‍या दोन्ही रंगांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. एखाद्या छटेमध्ये पांढरा रंग वरचढ असतो तर दुसर्‍या छटेमध्ये काळा रंग हा वरचढ असतो. याच धर्तीवर मानवी स्वभाव आणि समाज पण विविध छटांनी रंगलेला असतो. कुठलीच व्यक्ति आणि त्या व्यक्तीचा स्वभाव हा एकाच बाबीने परिपूर्ण असेल असे होत नाही. स्वभावातील आणि आयुष्यातील विविध जटिल अनुभव या छटा घडण्यात कारणीभूत ठरतात, व एकंदरच या छटा घडण्यात नेहमीच वेगवेगळी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्ययक्तिक अशी कारणे असतात.

आपल्यापैकी किती लोकं या सर्व बाबी लक्षात घेऊन समाजात वावरत असणार याचा विचार केला, तर ही संख्या अगदीच नगण्य दिसेल. आपल्याला अगदी लहानपणापासून हीच शिकवण दिली जाते की एखादी व्यक्ति ही एखाद्या क्षेत्रातील कामामुळे किंवा त्या क्षेत्रातील झालेल्या चुकीमुळे आयुष्यातील इतर क्षेत्रात पण तशीच असेल. याउलट एखाद्या व्यक्तिला एखाद्या क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे प्रत्येक क्षेत्रात अक्षरषा डोक्यावर घेऊन नाचवतात व त्यांचे ज्ञान आणि काम हेच सर्वोच्च आहे असे मानले जाते. भारत देशात गेल्या दहा-एक वर्षापासून अमुक ही व्यक्ति किती निस्वार्थी आहे, याचा अतोनात गाजावाजा केला जात आहे. संसारातून बाहेर पडल्याने त्या व्यक्तिला जगातील कुठल्याच वस्तूचा मोह उरलेला नाही त्यामुळे भ्रष्ट असण्याचा प्रश्नच नाही असा समज निर्माण केला जात आहे. बहुतेक या सर्व बाबीमध्ये सत्यता असेल ही,  पण या सगळ्यांची यशस्वीरीत्या देश चालवण्यात काही मदत होत असते का? तर कदाचित नाही. आतापर्यंतचा अनुभव हा तर नकारात्मकच दिसत आहे.

माझे उदाहरण द्यायचे झाले तर मी सुरक्षित आहार, शेती आणि शेतीप्रश्नावर काम करतो. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रातील लोकांना माझ्या कामामुळे मी खूप छान व्यक्ति आहे वगैरे वगैरे असा समज होऊ शकतो. पण शेती बद्दल मला जितक्या प्रकर्षाने आणि आत्मियतेने काम करावेसे वाटते तितक्याच आत्मियतेने मी बाकी क्षेत्रात पण काम करेल असे नाही. शेती क्षेत्रातील कामामुळे माझ्या वैयक्तिक जीवनात मी खूप मानवी नीती आणि मूल्यांचा विचार करत असेल, इतर लोकांविषयी सहानुभूती दर्शवत असेल असे ही ग्राह्य  धरले जाऊ शकत नाही. माझा स्वभाव हा भ्रष्ट, हुकुमशाही, दुष्ट, कुचकामी पण असूच शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात केलेलं छान काम हे त्या व्यक्तीचे प्रामाणिक असण्याचे आणि एकंदर वागणूक मानवी असण्याचे प्रमाण होत नाही. मानवी स्वभाव हा काळ्या-पांढर्‍या रंगाप्रमाणे कधीच परिपूर्ण आणि उघड नसतो, त्याला विविध छटा असतातच.

एका उत्तम कामामुळे कुणाला तरी देव म्हणून प्रस्थापित करणे, त्यांच्या इतर बाबींना कानाडोळा करणे, त्यांना प्रश्न विचारणार्‍यांना हिणवणे आणि खलनायक घोषित करणे ही आंधळी वर्गवारी पण समाजाच्या हिताची नसते. त्यामुळे कुठलीच व्यक्ति ही परिपूर्ण नसून राखाडी रंगाप्रमाणे त्या व्यक्तिची वागणूक ही वेळेनुसार आणि सोयीनुसार बदलत असते. हे लक्षात ठेऊन चिकित्सक वृत्तीने समाजाला आणि समाजातील प्रश्नांना बघितल्या गेले तरच स्वतः ला व समाजाला प्रस्थापित भोंदू, फकीर, नायक आणि तत्सम लोकांपासून सुरक्षित ठेवल्या जाऊ शकते.  

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...