काही महिन्यांपूर्वी एका भारतीय अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी आणि त्यामागे कोण किंवा काय असेल हे अद्याप एक गुढचं आहे. पण त्यानंतर ज्याप्रकारे समाजातील सर्वच भागांतून हिंदी चित्रपट सृष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने हिणवले गेले, ते अगदी लाजिरवाणे होते. प्रत्येक दोन-तीन दिवसात एक नवीन कारण घेऊन हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य केल्या जात होते. त्यातले एक बरेच गाजलेले कारण म्हणजे “नेपोटीज्म(Nepotism)”. समाजातील बहुतेक लोकांना “नेपोटीज्म” चा अर्थ सुद्धा माहिती नाही तरी या शब्दाचा कित्येक दिवस रवंथ केल्या गेला. गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून राजकरणात पण याच विषयाचा बोलबाला आहे. या धर्तीवर एका पूर्वनियोजित कामाप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य करण्यात आले.
“नेपोटीज्म” म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तिला एखाद्या कामाकरिता
दिले गेलेले प्राधान्य. अश्या वेळेस त्या व्यक्तीची पात्रता,
क्षमता आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते. पर्यायी
दूसरी व्यक्ति त्या विशिष्ट व्यक्तिपेक्षा उत्तम किंवा योग्य असून सुद्धा त्याचा
विचार केला जात नाही. वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर असलेल्या व्यवस्थेचा, पैशाचा, सत्तेचा किंवा कुठल्याही वस्तूचा अधिकार
फक्त आपल्या ओळखीच्या आणि आपल्या विश्वासातील विशिष्ट लोकांपुरता मर्यादित ठेवणे. या
सर्व प्रकाराचा परीघ कुटुंबापुरता मर्यादित न राहता यात मित्र, भागीदार, सहकारी आणि आपल्याला समोर जे कामात येऊ शकतील; अश्या इतर बर्याच लोकांचा समावेश होत जातो. बरं,
हे सर्व काही आपल्या समाजात अगदी पहिल्यांदा आणि फक्त चित्रपट सृष्टीतच होत आहे
असेही नाही. अगदी सुरुवातीपासून समाजातील वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टींमधे
“नेपोटीज्म” अस्तित्वात आहेच की.
भारतीय समाजावर जातीव्यवस्थेचा पगडा अगदी सुरुवातीपासूनच
आहे. जातीव्यवस्थेमुळे काही विशिष्ट जातीमधील लोकांना पिढ्या दर पिढ्या सर्वच
प्रकारचे विशेष अधिकार मिळत गेले आणि आताही मिळतच आहे. अश्या या विशेष
अधिकारांमुळे समाजातील होणारे शोषण आणि असमानता याबद्दल नव्याने सांगण्याची गरज
नाही आहे. आणि हे सगळं इतक्यात थांबेल असं चित्रं पण दिसत नाही. तेच राजकरणात पण
दिसून येते. आपल्या कुटुंबातील लोकांच्या कर्मावर नवीन राजकारणी तयार होतांना
दिसतात. यावर्षी कोरोंनाच्या आपत्तीमुळे दुर्गम भागातील आणि गरीब घरांतील बर्याच
विद्यार्थ्यांना नीट ची परीक्षा देता आली नाही. ज्यांना देता आली त्यांच्याकडे
व्यवस्था आणि पैसा अश्या दोन्ही गोष्टींचा विशेषाधिकार होता. मोठमोठ्या कंपनीचे
उत्तराधिकारीसुद्धा हे त्यांच्या कुटुंबातील असतात. भारतात २०१५-२०१६ पासून दोन
मोठ्या कंपंनींची खूप भरभराट होतांना दिसत आहे. रेल्वे व्यवस्था,
विमानतळ, विमा, बँक आणि अश्या बर्याच
सार्वजनिक कंपन्यांची मालकी ही या दोन कंपन्यांकडे एकवटली जात आहे. इतर कुणालाच
संधी न मिळता फक्त या दोन कंपनींना इतका अधिकार मिळणे हा निव्वळ योगायोग होऊ शकत
नाही. भारताच्या गृहमंत्राच्या मुलाला कुठलीही पात्रता नसून भारतीय क्रिकेट
मंडळाचे सचिव पद मिळणे हासुद्धा योगायोग राहू शकत नाही. ही तर फक्त काही निवडक
दिसून येणारी उदाहरणे आहेत. याव्यतिरिक्त पण इतर क्षेत्र आहेत जिथे हा प्रकार
प्रकर्षाने जाणवून येतो.
चित्रपट सृष्टीशी तुलना केली तर वर दिलेल्या उदाहरणांतील
नेपोटीज्म हे आपल्या समाजासाठी किंवा कुठल्याही समाजासाठी भरपूर घातक आहे. या सर्व
प्रकाराचा आपल्या समाजावर आणि आपल्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष फरक पडतो, पण याबद्दल आपण बोलायची कधीच तसदी घेत नाही. कुणीतरी स्वतः ची राजकीय आणि
सामाजिक बाजू बळकट करायला कुठलातरी अप्रचार करतो आणि आपण त्या अप्रचारला बळी पडतो.
नको त्या गोष्टींमध्ये ऊर्जा आणि वेळ गमावतो व सोबत समाजात असमानता आणि असहिष्णुता
वाढवतो ते वेगळच.
त्यामुळे जर कुठल्या नेपोटीज्म आणि घराणेशाहीबद्दल बोलायचे
असेल तर जातीव्यवस्था, आरोग्य,
शिक्षणव्यवस्था, समाजातील आर्थिक आणि सामाजिक असमानता, सरकारी व्यवस्थेचे होणारे खाजगीकरण याबद्दल बोलले पाहिजे. असे केल्याने
स्वतः चेच नाही तर समाजाचे सुद्धा भले होईल.
h
ttps://www.esakal.com/authors/aakaash-nvghre
Comments
Post a Comment