गेल्या ८-९ वर्षात समाजातील कळत नकळत होणार्या विविध प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढा देणार्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्या भरपूर व्यक्तींसोबत आणि सामाजिक संस्थांसोबत अगदी जवळचा संबंध आला. यातील काही व्यक्तींची किंवा संस्थांची पद्धती ही संघर्षाची तर काहींची नवनिर्माणाची. पण जवळपास प्रत्येक व्यक्तीचं आणि संस्थेचं काम हे उल्लेखनीय आणि तितकेच समाजाच्या हिताचे आहे. याप्रकारचे काम करणार्या व्यक्तीला समाजात “कार्यकर्ता” किवा “सामाजिक कार्यकर्ता” म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील काही लोकं स्वतंत्र्य म्हणजेच कुठल्याच संस्थेमार्फत किंवा संस्थेच्या नावाखाली काम न करण्याला पसंती देतात. तर काही लोकांना संस्थेसोबत काम करणे पटते. स्वतंत्र व्यक्तीगत काम करण्याचे तसेच संस्थेमार्फत काम करण्याचे साहजिकच काही फायदे तसेच काही तोटेसुद्धा असतात. स्वतंत्र काम करत असतांना तुमचे काम जर प्रस्थापितांच्या हितसंबंधांना उघड करत असतील किंवा प्रस्थापितांद्वारे होणार्या अन्यायाला उघड करत असतील तर तुमचे दैनंदिन जगणे हे अवघड होऊ शकते. दिवसेंदिवस ज्याप्रकारचे असहिष्णु वातावरण भारतात वाढताना दिसत आहे, अश्या परिस्थितीत तर याप्रकारच्या कामात स्वतःला झोकून देणे म्हणजे जीवाला धोका ओढवून घेणेच आहे. म्हणून बर्याचदा संस्थेमार्फत किंवा संस्थेसोबत काम करणे हे कार्यकर्त्यांना पसंतीस पडते.
प्रत्येक संस्थेमध्ये काही निवडक कार्यकर्ते असतात ज्यांना
स्थानिक लोकांची आणि त्यांचा प्रश्नांची छान ओळख असते व त्यांच्यासोबत काम
करण्याचा दांडगा अनुभव सुद्धा असतो. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणार्या
संस्थांसाठी आणि समाजसुधारकांसाठी हे कार्यकर्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. बर्यापैकी
होणारे मूलभूत काम हे त्यांच्यामार्फतच होत असतात. उत्तम नेतृत्वक्षमता आणि
लोकांना बोलकं करण्याच्या गुणांमुळे हे कार्यकर्ते बर्याच सफाईने काम करतात. पण
इतके सगळे असूनही या कार्यकर्त्यांना समाजातील दुर्बल घटकांचे,
स्थानिक गावपातळीवरील सोडले तर इतर ठिकाणी प्रतिनिधित्व करायला मिळाले अशी उदाहरणे
फार क्वचितच. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होणार्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये
या कार्यकर्त्यांना व त्यांच्या कामाची किंवा लोकसमूहाच्या प्रश्नांची मांडणी
करायला संधी मिळतांना दिसत नाही.
जुन्या रूढी आणि परंपरेने ग्रासलेल्या आपल्या समाजात विविध
प्रकारच्या वर्गवार्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. एका विशिष्ट जातीवर्गाचा
आणि श्रीमंत व अतिश्रीमंतांचा पगडा हा सर्वच क्षेत्रात अगदी ठळकपणे दिसून येतो. या
पगड्यामुळे साहजिकच काही लोकसमूह हे दुर्बलच राहतात. अश्या या दुर्बल लोकसमूहांना
आवश्यक असलेल्या विकासात्मक कामांमध्ये आपल्याला सामाजिक संस्था आणि सामाजिक
कार्यकर्ते काम करतांना दिसतात. उदारमतवादी विचार घेऊन सर्वांना समाजातील मुख्य
धारेत आणण्याचे यासर्वांचे ध्येय असते. पण याच उदारमतवादी विचारांचा उपयोग दुर्बल
घटकांमधून आणि जमीनपातळीवर काम करणार्या कार्यकर्त्यांमधून नवीन नेतृत्व
तयार करण्यास होत नाही. एकीकडे आपला हा हट्ट असतो की गुणवत्तेच्या आधारे सर्वच
लोकांना काम आणि व्यासपीठ निवडीचे समान स्वातंत्र्य असावे. आणि दुसरीकडे आपल्याला
प्रस्थापित असलेली मंडळीच फक्त नेतृत्व करतांना दिसतात. प्रस्थापित मंडळी सोडून
इतर नेतृव असेल तर ते वंशवादातून आणि जातिवादातूनच का असते ? प्रस्थापितांना
सोडून इतर कोणत्याच व्यक्तिमधे नेतृत्वाक्षमता किंवा गुणवत्ता नाही, ही तर अशक्यप्राय बाब आहे. तरी मग इतर लोकांना प्रतिनिधित्व करायला का
मिळत नाही ? हा प्रश्न आपण स्वतः ला विचारायला पाहिजे.
एखाद्या चळवळीमध्ये किंवा संस्थेमध्ये असे क्वचितच घडले
असेल जिथे दुर्बल समाजातील नेतृत्व हे
प्रस्थापित नेतृत्वाच्या तोडीचे आणि समांतर निर्माण झाले. लोकांना स्वतः चे
प्रश्न स्वतः मांडता येतील, याप्रकारचे ज्ञान आणि कौशल्य त्यांना देता
येईल काय ? किती दिवस आपण स्वतःला दुर्बल घटकांचे कैवारी
म्हणून मिरवून घेऊ ? ज्या जटिल आणि अमानवी वर्गवारीच्या व्यवस्थेला
झुगारून आपण समाजात समता आणायचा प्रयत्न करतो, त्याचेच आपण
गुलाम आहोत का ? व त्याचे अनुकरण आपल्यामार्फत होत आहे
यापासून अनभिज्ञ आहोत काय ? का बहुसंख्य समाजसुधारक आणि
सामाजिक संस्थांचे प्रमुख हे एका विशीष्ट सामाजिक आणि आर्थिक वर्गातील असतात ? कुठल्याच चळवळीमध्ये दुर्बल घटकामधून समांतर नेतृत्व का निर्माण होत नाही
?
एका क्षेत्रातील वर्गवारी संपवायच्या नादात आपण दुसर्या
क्षेत्रात जुन्याच जातीव्यवस्थेला आणि अर्थव्यस्थेला चिकटून असलेली वर्गवारी ही
नवीन बाटलीत टाकून पुन्हा तिचे मुळं तर मजबूत करत नाही आहोत हे तपासण्याची आज गरज
आहे.
Comments
Post a Comment