तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका भारतीय कलाकाराचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळलेले नाही. तेव्हापासून संपूर्ण भारताला किंवा भारतातील माध्यमांना फक्त आणि फक्त त्या घटनेचे वेध लागलेले दिसत आहेत. त्या घटनेनंतर कोरोंना, पुरस्थिती, बेरोजगारी, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी बरीच संकटे सतत भारताला प्रश्न विचारात आहे. इतके असूनही अपवाद एक दोन माध्यमे सोडली तर कुणीच या खर्या प्रश्नांबद्दल बोलत नाही आहे. हा जोमात सुरू असलेला खेळ सर्वांनाच माहिती आहे, तरी मी हे लिहिण्याचा खटाटोप का करतोय हे बघूया.
महात्मा गांधीजींचे तीन माकड हे भारतात
बरेच प्रसिद्ध आहे. या तीन माकडांपैकी एकाने त्याचे डोळे झाकलेले आहे, दुसर्याने
कान झाकलेले आहे तर तिसर्याने तोंड झाकलेले आहे. या तीन माकडांच्या तत्वज्ञानाचे
मूळ जपान या देशातील आहे. साधारण १७ व्या शतकापासून या तत्वज्ञानाचा उपयोग होताना
दिसतोय. हे उदाहरण “वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू
नका” अशी शिकवण देते. शांतता आणि सहनशीलतेच्या प्रचारात या तत्वज्ञानाचा महात्मा
गांधींनी उपयोग केला. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी
नक्कीच या तत्वाची गरज होती आणि त्याला यश सुद्धा मिळाले. भारतीय समाजाने
उत्तमरीत्या हे तत्वज्ञान अंगीकृत केलेलं दिसतेय, फक्त त्याची
दिशा थोडी भरकटत गेली. या उदाहरणातील वाईट हा शब्द गळून त्याची जागा आता “सत्य” या
शब्दाने घेतलेली आहे. आणि एक नवीन तत्वज्ञान किंवा एक नवीन जगण्याचा मार्ग यातून
निर्माण झाला तो म्हणजे “सत्य बघू नका, सत्य ऐकू नका आणि
सत्य बोलू नका”.
२०१३ साली एडवर्ड स्णोडेण या अमेरिकन
व्यक्तीने अमेरिकन गुप्तचर संस्था कश्याप्रकारे काही जागतिक पातळीच्या संस्थांसोबत
मिळून लोकांवर पाळत ठेवत आहे हे उघडकीस आणले होते. याप्रकारचे प्रयत्न इतरत्रही
होतांना दिसत असतातच. जरी एडवर्ड स्णोडेण या व्यक्तीने लोकहितासाठी हे प्रकरण
उघडकीस आणले, पण त्यालाच खलनायक म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्यावर
देशद्रोहाचा आणि असे विविध खटले चालवण्यात आले. तर मुद्दा असा की सत्याची बाजू
घेऊन आणि खरे बोलून त्याने स्वतःच्या पायावर जणूकाही कुर्हाड मारून घेतली. अशी
उदाहरणे आपल्याला समाजात सर्वत्रच दिसून येतात. अगदी छोट्या छोट्या स्वार्थासाठी
आणि हितसंबंधासाठी आपण सत्याची बाजू घेत नाही. खूप हिम्मत करून कुणी सत्य बोलायचा
प्रयत्न केला तर त्याचे भयंकर दुष्परिणाम त्या व्यक्तिला सोसावे लागतात. हे बघून
मग इतर कुणी सत्याची बाजू घेण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत नाही.
वर नमूद केलेला कलाकाराच्या विषयाला किती
महत्त्व द्यायचे हे मी ठरवू शकत नाही आणि त्याचा मला अधिकार पण नाही. सध्या
भारताची परिस्थिति बघितली तर आपल्या देशाला भेडसावणारे अगदी मूलभूत असे बरेच
प्रश्न आहे. ते सर्व प्रश्न विसरून भारतीय
समाज आणि माध्यमे फक्त त्या कलाकाराच्या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सतत चालवत
बसले आहेत. त्या घटनेबद्दल कितीही चर्चा केली तरी त्यातून सकारात्मक काहीच निघणार
नाही तरीही इतक्या उत्स्फूर्तेपणे का सर्वच त्यामध्ये सहभागी होत असतील ? तर त्याचे कारण असे की त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरिता तुम्हाला
कुठलीच सत्याची बाजू घ्यावी लागत नाही आणि खोट्या अर्धसत्य गोष्टीचे मनोरे
बांधायचे स्वप्न पूर्ण होते ते वेगळच.
एक समाज म्हणून आणि एक देश म्हणून आपण सध्या
खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. एक सुजाण नागरिक म्हणून आवश्यक त्या वेळेवर
सत्याची बाजू न घेतल्याने आज आपला देश वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक खड्ड्यात जात
आहे. पण याची सुरुवात बरीच आधी झाली होती. जेव्हा स्वतःचा स्वार्थ आणि हितसंबंध
जोपासणे हे प्राथमिक झाले अगदी तेव्हापासूनच आपल्या समाजाची अधोगती सुरू झाली
होती. आता जे काही दिसत आहे ते तर त्याचे फक्त परिणाम आहेत, आणि
त्या परिणामांची तीव्रता दिवसेंदिवस आणखी जाणवायला लागणार आहे. अभिव्यक्ती
स्वातंत्र्य, सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण, कोसळती न्यायव्यस्था ही तर जणू सुरुवात आहे. इतके सगळे होऊनही आपण
सत्याची बाजू घेऊ शकत नसू तर आपल्या देशाचे आणि समाजाचे काही खरे नाही.
त्यामुळे क्षुल्लक स्वार्थासाठी आणि
हितसंबंध जोपासण्याएवजी सत्याची बाजू घेणे, त्याबद्दल चर्चा करणे आणि योग्य तो निर्णय
घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.
Comments
Post a Comment