Skip to main content

इवेंटीकरण

गेल्या काही वर्षापासून लोकांचा किंवा कमीत कमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणार्‍या घटनांच्या(Events) बाजूने जास्त दिसतोय, आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी प्रणाली, खाजगी कंपनी, निवडणुका, सामाजिक संस्था आणि इतरत्रही, जणूकाही समाजाला मोठमोठ्याला सतत होणार्‍या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे.

घटना(Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काही तरी अपेक्षित असतेच असे नाही. बर्‍याचदा काहीही समोर मागे नसतांनाही घटना घडवल्या जातात किंवा साजर्‍या केल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून घटना घडायच्या किंवा साजर्‍या केल्या जायच्या, त्यामुळे त्यामागे काही कारणे असायची, त्यातून काही तरी अपेक्षित असायचे. पण आता असे दिसत नाही प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्व दिले जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे होताना दिसत नाही. पण प्रक्रियेतील प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव्य रूप देण्याचा प्रयत्न मात्र सतत होत असतो. कुठलेतरी एक शाब्दिक भूषण वापरुन घटनांचा इतका गाजावजा होतोय की जणू ज्या प्रश्नासाठी किंवा समस्यासाठी हा खटाटोप सुरू आहे ते लगेच सुटलेच समजा.  

ध्वणीप्रदूषण कमी व्हावे म्हणून बर्‍याच संस्था आणि लोक “हॉर्न नको” चे माहितीफलक घेऊन चौका-चौकात दिसतात. हा सर्व प्रकार मोडतो एका विशिष्ट घटनेमध्ये (Event) ज्याचा दीर्घकालीन उपयोग होईल किंवा वाहनचालक हॉर्न वाजवणार नाही याची शक्यता खूपच कमी असते. कारण त्यामागची संपूर्ण लोकशिक्षणाची प्रक्रिया ही पुरेशी नाही. सामान्य जनतेला साधे वाहतुकीचे नियम माहिती नसतात त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे आणि इतरांनी हॉर्न वाजविणे ही साखळी निरंतर चालूच राहील जोपर्यंत आपण मूळ प्रश्नावर काम करणार नाही. याचप्रकारे प्रक्रिया डावलून घटनांच्या मागे धावायची पद्धत आता सर्वच क्षेत्रात रूजली आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम, शिबिरे, यात्रा अश्या प्रकारच्या घटनांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन हे आता पूर्वीपेक्षा जास्त होताना दिसते, आणि विशेषकरून युवावर्गातील एका मोठ्या घटकाचा कल हा प्रक्रियेकडे नसून घटणे(Event) कडे आहे, कारण हा प्रसिद्धी मिळवायचा अगदी सोपा आणि सहज शक्य असणारा मार्ग आहे.

शहरे आणि गावे अशी वर्गवारी प्रस्थापित झाल्याने दिवसेंदिवस गावखेड्यात उपजीविकेची साधने कमी होत चालली आहे. परिणामी लोकांचे शहराकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. अश्या परिस्थितीमध्ये गावातच लोकांना रोजगार मिळेल या हेतूने बर्‍याच संस्था आणि व्यक्ति काम करत असतात आणि ती एक लांबलचक प्रक्रिया असते, अगदी एका रात्री मध्ये लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटत नसतो किंवा रोजगारासाठी लागणारे कौशल्य अवगत होण्याकरिता एक कालावधी लागतो, आणि या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्याशिवाय पुढे फार काही होऊ शकत नाही. याउलट गावातील लोकांची अवस्था बघून काही लोक त्यांना सरळ एकदा वस्तूरूपात मदत करतात, पण याप्रकारे एकदा केलेल्या मदतीच्या कार्यक्रमाने प्रश्न सुटतो काय, तर बिलकुल नाही. अशीच काही अवस्था आहे ती शेतकरी बांधवांची. शेतकरी शेतात राबून आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो आणि त्या अन्नाच्या आधारे आपण जीवंत असतो. ही अन्न पुरवून जगाचे भरणपोषन करण्याची एक मोठी निरंतर प्रक्रिया कित्येक वर्षापासून सुरू आहे. पण एखाद्या रूग्णाला औषध देऊन जेव्हा डॉक्टर त्याला ठीक करतो किंवा त्याचे प्राण वाचवतो तेव्हा डॉक्टर ला चक्क देवासारखी वागणूक मिळत असते याउलट जो शेतकरी बांधव आपल्याला एका प्रक्रियेमार्फत जिवंत ठेवतो त्याला सन्मानजनक वागणूक कधीच मिळत नाही. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस अश्या या आपण बनविलेल्या वर्गवारीने सामाजिक आणि आर्थिक खड्ड्यात खेचल्या जातोय. एकदा प्राण वाचविणे किंवा सामुग्री पुरविणे ही एक घटना आहे आणि निरंतर रोजगार आणि अन्न पुरविणे ही एक प्रक्रिया.

याच धर्तीवर सध्याचे सरकार काम करत आहे. मोठमोठ्या घटना(Events), भरपूर जाहिरातबाजी, भपकेदार नाव यावरच जास्त भर दिल्या जातांना दिसतो आहे व घटना घडली म्हणजे काम झालेच असा लोकांना समज द्यायची किंवा आभास करून देण्याची ही उत्तम प्रणाली आहे. या सर्वांची सांगड घालून लोकांना आवश्यक असलेल्या प्रक्रियेपासून भरकवटायच आणि विविध घटनामध्ये गुंतून ठेवायच व सरकार चालवायच हीच जणू यशाची गुरुकिल्ली झाली आहे.

 

शेवटी काय तर, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे.

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...