Skip to main content

कळत नकळत, वर्गवारी.

 

हा स्तंभ सुरु व्हायच्या आधी मला विचारण्यात आलेलं कि स्तंभाचे नाव काय असेल तर मी क्षणाचाही विचार करता "वर्गवारी" हे नाव सांगून दिले. पण नंतर मात्र दोन-तीन मित्रांसोबत या नावाबद्दल थोडा विचारविमर्श केला तर त्यांचे म्हणणे असे पडले कि "वर्गवारी" हा शब्दच जरा भारी होतोय आणि या शब्दाचा आपल्या जीवनातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असलेला संबंध सर्वाना कळेलच असे नाही. वरून "वर्ग" हा शब्द जरा डाव्या विचारसरणीचा वाटतो त्यामुळे डाव्या विचारसरणीचा शिक्का लागेल ते वेगळच. मग मी स्तंभाचे नाव बदलण्याचा विचार करत होतो पण मला पुन्हा प्रश्न पडला कि असं हे गोड-गोड लिहून किंवा प्रश्नाला सरळ हात लावून पण किती दिवस चालणार ? कधीतरी हे करावे लागणारच आणि एकदा काय जातिव्यवस्थेप्रमाणे स्तिथी हाताबाहेर गेली कि बराच उशीर होऊन गेलेला असेल, म्हणून मी याच शीर्षकाखाली लिहायच हा निर्णय घेतला.

 

तर नेमका मुद्दा हाच आहे कि आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रस्थापित वर्गवारी मध्ये इतके गुंफले गेलेलो आहे कि आपण या वर्गवारीचा एक अविभाज्य घटक असून आपण स्वतः पण वर्गवारीला पूरक असेच काम किंवा कृती करतो हे आपल्याला गवसत सुद्धा नाही. गेल्या सदरात शेती, जंगल, माणूस, पशु यातल्या वर्गवारीबद्दल लिहले तर चक्क काही लोक फक्त मला मारायचे तेवढे शिल्लक राहिले. जेव्हा शेती, जंगल आणि वन्य पशु च्या वर्गवारीबद्दल लिहिने इतकं वादग्रस्त आहे तर माणसा-माणसात असलेली आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैयक्तिक आणि वि

विध रूपे धारण केलेली वर्गवारी किती जटील आणि भयानक असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. 

 

जेव्हा आपण एका विशिष्ठ उच्चं वर्गात (सामाजिक, आर्थिक किंवा वैयक्तिक) मोडले जातो तेव्हा समाजात अस्तित्वात असलेल्या विविध वर्गवारीमुळे होणाऱ्या त्रासाची झळ आपल्याला कधीच पोहचत नाही. वर्गवारीचा त्रास सोसणारा किंवा अन्याय सहन करणारा हा नेहमीच वर्गवारीत खालच्या थराला असतो. समाजाच्या होणाऱ्या  हानी बद्दल किंवा वर्गवारीच्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडलेला असतो. म्हणूनच समाजातील दिसणाऱ्या आणि दिसणाऱ्या वर्गवारीबद्दल प्रकर्षाने लिहणे, त्याला प्रकाशझोतात आणणे आणि त्यावर उपाययोजना करणे हि आज काळाची गरज होऊन बसली आहे.

               

आपल्या भारत देशात जातीव्यवस्था हि भरपूर मजबूत आहे. कामानुसार आणि व्यवसायानुसार अस्तित्वात आलेली जातीव्यवस्था समोर जाऊन वर्गवारीला जन्म देईल याचा विचार देखील आपल्या पूर्वजांनी केला नसेल. पण सत्तेच्या आणि शक्तीच्या हव्यासापोटी या जातीव्यवस्थेत काही लोकांनी शक्कल लढवत काही विशिष्ट काम अति महत्त्वाचे आणि काही काम कमी महत्त्वाचे अशी आखणी केली आणि त्यातून वर्गवारीला सुरुवात झाली. जातिव्यवस्थेच्या बाहेर पडून लवकरच वर्गवारीने मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रात आपली जागा निर्माण केली आणि आधी फक्त जातिव्यवस्थेमुळे अस्तित्वात असलेली अमानुष वागणूक आणि अपमान आता इतर वर्गवारीनेही  लोकांना मिळायला सुरुवात झाली. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर जातीय वर्गवारी बद्दल बरच लिहलं जात आहे आणि त्या वर्गवारीला नाहीस करण्याचे किंवा लवचिक करण्याचे प्रयत्न सुद्धा होत आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले आणि विविध समाजसुधारकांच्या प्रयत्नाने जातीय वर्गवारीला भेदण्याचा प्रयत्न झाला आहे. पण इतर स्वरूपातील वर्गवारीला भेदणे सुद्धा समाजात न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि  समता टिकवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

 

आर्थिक सुबत्ता, शैक्षणिक पात्रता, लिंग, विचारसरणी, ग्रामीण- शहरी, बोली भाषा, राजकीय संबंध, व्यवसाय, कामाचे स्वरूप, राहणीमान, रंगरूप अश्या बऱ्याच नवीन वर्गवाऱ्या उदयास आलेल्या आहे ज्याने समाज आणखी अनेक तुकड्या-तुकड्या मध्ये विभाजित होत आहे. उदाहरण म्हणजे काही विशिष्ट विचारसरणीचे किंवा व्यवसायातील लोक स्वतःला अतिशय तत्ववादी, प्रामाणिक आणि महत्वाचे समजतात. पण तेवढ्यावरच ते थांबून इतर व्यवसायाला किंवा विचारसरणीला दुय्यम मानून त्यांना नेहमी हिणवण्याचा सारखा प्रयत्न होत असतोच. अश्या या विविध तुकड्या तुकड्या मध्ये विभागलेल्या समाजाचे एक पाऊल पुढे जाता मागेच जाताना दिसत आहे. जातीव्यवस्थेतील वर्गवारीसाठी नियम आणि कायदे असल्याने त्यावर अंकुश ठेवायला किंवा त्यातील त्रुटी सुधारण्यास मदत झाली पण इतर स्वरूपाच्या वर्गवारीबद्दल कधीच बोलले जात नाही किंबहुना त्याबद्दल विचार पण केला जात नाही त्यामुळे आपण या प्रकारच्या वर्गवारीला बळी पडतोय हेसुद्धा आपल्याला कळत नाही.

 

म्हणूनच "वर्गवारी".


https://www.esakal.com/authors/aakaash-nvghre

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...