Skip to main content

तंत्र-न-ज्ञान

गेल्या अनेक वर्षापासून मानवप्रजाती मंगळावार घर वसवण्याची गोड स्वप्न बघत आहे. काळ इतक्या वेगाने बदलतो आहे की तंत्रज्ञानाच्या जोरावर काहीही करू शकण्याची धम्मक आता मानवप्रजाती बाळगत आहे. पण हा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता, इथपर्यन्त पोहोचायला सुद्धा माणसाला बरीच वर्षे लागली. अश्मयुग, धातुयुग, यंत्रयुग, अश्या विविध टप्प्यातून आजचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. सध्या आपण माहिती तंत्रज्ञान आणि बिग डाटा या युगात जगतो आहे हे म्हणायला हरकत नाही. यंत्रयुगात ४ औद्योगिक क्रांत्या घडून आल्या. पाणी आणि वाफेचा शक्तीचा उपयोग करून यंत्र चालवून उत्पादन करणे हे पहिल्या औद्योगिक क्रांति मध्ये शक्य झाले. दुसर्‍या मध्ये विजेचा वापर करून आणि तिसर्‍या मध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे औद्योगिक क्रांति घडून आली. आता आपण बघत असलेली ही चौथी औद्योगिक क्रांति आहे ज्यात तिसर्‍या औद्योगिक क्रांतीतील काही घटक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Intelligence), इंटरनेट ऑफ थिंग्ज, जनुकीय तंत्रज्ञान(Genetic Engineering), यंत्रमानव आणि रोबोटिक्स अश्या विविध वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून अशक्य काम शक्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व घडत असताना मानवाच्या जीवनात बरेच बदल घडून आले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाने बरीच प्रगती केली, शेतीचे उत्पादन वाढून उपासमारी कमी करण्यात आली, विविध आजारांवर लस आणि औषध यांचा शोध लाऊन रोगराईनवर विजय मिळवण्यात आला॰  एकंदरच मानवाचे जीवन हे सुसह्य होत गेले. 

तंत्रज्ञानासोबत आणि त्याचा अवतीभोवती हे असे छान छान होत असतांनाच काही अनावश्यक घटना पण घडून आलेल्या आहेत. ज्यावर हवे तितकेसे लक्ष दिले गेले नाही किंवा त्याबद्दल फारसा विचार पण केलेला नाही आणि नवीन तंत्रज्ञान आहे म्हणून ते छानच आणि उपयोगी असणार असाच सर्वस्वी समज होऊन बसलेला आहे. कदाचित तंत्रज्ञानाने मानवजातीचा आणि एकंदर जीवसृष्टीचा जितका नफा नसेल झाला त्याअधिक तोटाच जास्त झालेला दिसत आहे. जेव्हा एखाद्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण समाजात करत असतो तेव्हा ते फक्त एक तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील एक नवे पाऊल किंवा एक मैलाचा दगड असा नसून त्यामुळे समाजात पण विविध आर्थिक, सामाजिक, भौगोलिक आणि वैयक्तिक बदल घडून येतात.

पण हे सर्व खटाटोप करत असताना आपण निसर्गाचे आणि जैवविविधतेचे नियम तोडत आहोत का हे पाहणे अनिवार्य आहे कारण याने मानवाच्या आणि एकूणच संपूर्ण जिवसृष्टीचा अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. तंत्रज्ञानाणे बहुतेकदा अनुलंब वाढ(Vertical Growth) होत असते ज्यात समाजातील मोजक्याचा लोकांना फायदा होत असतो. भारतात आता बर्‍याच छोट्या-मोठ्या शहरात मेट्रो चा गाजावाजा सुरू आहे. हायपरलूप रेल्वेने(Hyperloop) मोठी औद्योगिक शहरे जोडण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे, ज्यात तब्बल ताशी १००० किलोमीटर या वेगाने रेल्वे धावतील. पण खरच अश्या अतिखर्चीक आणि भरपूर ऊर्जा लागणार्‍या  तंत्रज्ञानाची गरज आपल्याला आहे काय ? त्यांचा एकंदर कार्बन पदचिन्ह(Carbon Footprint)किती असणार ? त्यांना लागणारी प्रचंड ऊर्जा ही परत ८-१० गावातील लोकांच्या जिवावरील कोळस्यातून निर्माण होईल का ? हो असेल तर त्या गावातील लोकांना स्थलांतर करण्यासाठी किती खर्च येईल ? पर्यावरनाची किती हानी होईल आणि त्याची किमत कोन मोजणार ? वगैरे वगैरे. यासारखे बरेच प्रश्न आहेत जे कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाच्या अम्मलबजावणीच्या आधी स्वताला आणि समाजाला विचारायला हवे. भारतासारख्या देशात जिथे बेरोजगारीने धुमाकूळ घातला आहे तिथे बहुतांश लोकांचे मानवी कष्ट जितके जास्त उपयोगात आणता येईल तितके चांगले, ना की एक यंत्र वापरुन जे १० लोकांचे काम कमी करेल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा नवीन तंत्रज्ञानानेच सुटतो हा शुद्ध मूर्खपणा आहे.  मी स्वतः बर्‍याच युवकांच्या उपक्रमाचा(Start Up, समाजकार्य) भाग असल्याने तंत्रज्ञानाची वर्गवारी खूप जवळून पाहता आली. एखादं तंत्रज्ञान आधारित स्टार्ट अप(Start Up) असेल तर त्याला नेहमीच अवाजवी डोक्यावर घेतले जाते मग त्याची समाजातील कुठलेही प्रश्न सोडवण्याची क्षमता कमी असली तरीही. बर्‍याचदा एखादा प्रश्न सोडवणे हा मुख्य हेतु बाजूला राहून त्याला तंत्रज्ञानानेच कसं सोडवता येईल हाच आग्रह होऊन बसतो.

 

त्यामुळे तंत्रज्ञान आणि ज्ञान याची सांगड घालून सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक आणि इतर विविध बाबींचा विचार करूनच तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला पाहिजे नाहीतर हिरोशिमा-नागासाकी, चेर्नोबिल, फुकुशिमा, बीटी कापूस, कृत्रिम बुद्धिमत्तेने रचलेल्या नवीन भाषेतील संभाषण ह्यांची निरुपयोगी अटळ पुनरावृत्ती होत राहील.

 

 

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...