इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये असताना मला घरून पैशे चोरायची वाईट सवय लागली होती. पैशांच्या नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैशे ठेवल्याने दुप्पट होतात. याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो, कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन वर येतात. माझ्या चोरीच्या सवयीबद्दल जेव्हा घरी कळाले तेव्हा मला भरपूर चोप बसला आणि मला जवळपास मध्यरात्रीच्या समोरपर्यंत बाहेर ठेवण्यात आले होते. हे सर्व घडलं हिवाळ्यात व नागपूरमध्ये हिवाळ्यात बर्यापैकी थंडी असते. एक जमेची बाब होती ती म्हणजे मी त्या चोरलेल्या पैशांचा गैरवापर करत नव्हतो. त्यांचा वापर मी कधीच वाम मार्गी लागण्यासाठी पण केला नाही. घरच्यांनी चोप दिल्यामुळे किंवा स्वतःची चूक समजल्याने म्हणा त्यानंतर माझी चोरी करण्याची सवय मात्र तुटली. पण घरच्यांनी म्हणजेच माझ्या आई-बाबांनी प्रेमापोटी जर मला चोप दिला नसता किंवा जाब विचारला नसता आणि आपलाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित माझा चोरी करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता आणि समोर जाऊन मी एखादा मोठा चोर किंवा दरोडेखोर होऊ शकलो असतो. अर्थातच असे काही घडले नाही आणि याचे पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे माझ्या आई-बाबांना. पुत्रप्रेमाला बळी न पडता त्यांनी मी केलेल्या चुकांची सावरासावर केली नाही व योग्य तो निर्णय घेतला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकारण्याची आणि त्याला सुधारण्याची किती लोकं हिम्मत दाखवतात, याचे समाजातील प्रमाण पडताळून बघितले तर ते नक्कीच कमी मिळेल.
आपल्या अवतीभवती बरीच अशी उदाहरणे दिसतील जिथे आई-बाबांच्या
प्रेमापोटी चुकलेल्या निर्णयामुळे त्यांच्या मुलांचे आयुष्य मातीत गेले. कुठलाही
मोठा हुकूमशहा, गुन्हेगार, गुंड,
आतंकवादी किंवा निरंकुश व्यक्तिमत्त्व असलेला/ली व्यक्ति ही जन्मजात असंवेदनशील नसते
पण ती त्याप्रकारे घडत जाते आणि बर्याचदा ती व्यक्ति आप्तजनांनी योग्य वेळेवर जाब
न विचारल्याने किंवा चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकार न केल्याने पुढे
अंगवळणी पडत जाते. हुकूमशहा हा विषय निघाला की आपल्याला फक्त हिटलर आणि वर्तमान काळातील
काही देशांचे राज्यकर्तेच दिसतात पण दररोजच्या जीवनातील उदाहरनांच काय ? हे सर्व हुकूमशहा अगदी लहानपनापासूनच असे नसणार, यांनी
वारंवार केलेल्या चुकांना कानाडोळा झालेला असेल. आपले त्या व्यक्तीशी संबंध खराब
होऊ नये किंवा प्रेमापोटी त्यांच्या पालकांनी, भावंडांनी आणि
समोर जाऊन मित्रपरिवाराने कधीच त्यांना जाब विचारलेला नसेल. परिणामी, त्यांचा आत्मविश्वास वाढून ते या पातळीवर पोहचू शकले. हिटलर, ट्रंप, मोदी यांनी केलेल्या चुकांबद्दल आपण नेहमीच
बोलत असतो पण हेच आपण आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत करत नाही. तेव्हा आपली नीती आणि मूल्ये ही मुद्दाम डावलली जातात.
तथाकथित सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने याप्रकरचे
अनुभव अगदी जवळून बघायला मिळतात. लोकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना
जवळपास सगळेच नीती आणि मूल्यांचा डोंगर उभारतात. परंतू याच नीती-मूल्यांचा मात्र स्वतःच
जीवनातील निर्णयप्रक्रियेत फार काही वाटा दिसत नाही. हिटलर सारखी पातळी
गाठल्यानंतर त्याच्यावर ताशेरे ओढून फार काही उपयोग होत नाही. वेळोवेळी
आपल्यासोबत किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अन्यायाबद्दल आणि चुकांबद्दल
बोलल्याने एखादा हिटलर इन मेकिंग(Hitler in making) मात्र नक्कीच दुसरी वाट घेईल.
परंतू, हे करणे आपल्याला शक्य आहे का आणि ते
करण्यासाठी आपल्या पाठीत कणा उरला आहे काय ?
आपला मित्र नेहमी मुलींना काही तरी अभद्र बोलतो पण आपण
मैत्रीखातर त्याला काही म्हणत नाही. कुठलीतरी मोठी व्यक्ति काही तरी चुकीच करते
तेव्हा आपण काही करत नाही कारण आपल्याला समोर जाऊन त्या व्यक्तीची गरज भासू शकते.
आपले गुरु(idol/mentor) बोलतात एक आणि करतात एक पण आपण गप्प असतो कारण ते
आपले गुरु असतात. आपला बॉस किंवा वरिष्ठ कुठल्यातरी विशिष्ट व्यक्तिला मजा म्हणून
नेहमी त्रास देत असतो पण आपल्याला बढती हवी असते म्हणून आपण पुन्हा गप्प असतो. अशी
अनेक उदाहरणे बघायला मिळतील जेव्हा आपण आपल्या क्षुल्लक-क्षुल्लक फायद्यांसाठी
सत्य आणि न्यायाची बाजू न घेता अन्यायाची बाजू घेतो आणि आपण स्वतः एका असंवेदनशील
हुकूमशहाला जन्म घालतो. म्हणूनच वेळोवेळी सत्याची बाजू घेऊन उभे राहणे त्याबद्दल
बोलणे हे आपल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी आवश्यक असते. संत तुकाराम म्हणूनच गेले
आहेत
“ राजयाचा
पुत्र अपराधी देखा, परीका तो कोना दंडवेल.”
Comments
Post a Comment