Skip to main content

सकाराम-नकाराम

आपण सतत-सतत गोड पदार्थ खात असलो की लवकरच आपल्याला गोड पदार्थांचा वीट येतो आणि ते येणं अगदी साहजिक आहे. मग यावर उपाय काय तर आपण झणझणीत तिखट खातो आणि चव बदलण्याचा प्रयत्न करतो. हिच परिस्थिती सध्या आपल्या समाजाची होऊन बसली आहे, अक्षरषा समाजातील बहुसंख्य लोकांना गोड-गोड बोलण्याचा पुळका आलेला आहे. म्हणजे काय तर समाजातील आणि अवतीभवती होणार्‍या फक्त “सकारात्मक” गोष्टींकडेच लक्षं द्यायचं किंवा दखल घ्यायची आणि बाकी गोष्टी जणू अस्तित्वातच नाही आहे हे धरून चालायच. या लेखमालेच्या सुरूवातीच्या “समाजातील वर्गवारीवर प्रकाशझोत टाकण्याची गरज” या लेखात नमूद केल्याप्रमाणे असं हे सकारात्मक-सकारात्मक किती दिवस चालेल आणि अश्या या प्रवृत्तीमुळे समाजाचे किंवा आपले वैयक्तिक किती भले होईल ? किंवा फक्त सकारात्मक बाबींकडेच लक्ष दिल्या गेलं तर नकारात्मक बाबींमध्ये अडकलेले लोकं आणि त्यांच्या प्रश्नांच काय होईल ?

उदाहरणार्थ मला अभ्यासक्रमात भूगोल, गणित, विज्ञान आणि इतिहास हे चार विषय आहेत. या चार दिलेल्या विषयापैकी भूगोल, इतिहास आणि विज्ञान या तीन विषयात मला नेहमी छान गुण पडतात म्हणजेच ही झाली सकारात्मक बाजू. गणितात मात्र छान गुण मिळत नाही ही झाली नकारात्मक बाजू. पण गणितात छान गुण मिळवायचे असतील तर सगळ्यात आधी मी गणित या विषयात थोडा कमकुवत आहे हे मला मान्य करावं लागेल. त्यानंतर विशेष लक्ष देऊन आणि अतिरिक्त अभ्यास करून गणित या विषयात नेमकी कमकुवत असलेली बाजू कोणती हे समजून तिला भक्कम करावी लागेल आणि त्यानंतरच मला गणित या विषयात छान गुण मिळणे सुरू होईल. पण मी फक्त सकारात्मक बाबींकडे म्हणजे भूगोल, इतिहास आणि विज्ञान याकडेच लक्षं दिल आणि बाकी बाबींकडे दुर्लक्ष केल तर गणित या विषयात सुधारणा कधीच होऊ शकणार नाही.

वेगवेगळ्या कामामूळे सामाजिक क्षेत्रातील आणि विशेषत युवा वर्गातील विविध लोकांशी नेहमी चर्चा होत असते तर सर्वांचा बर्‍यापैकी सुर असाच असतो की आपण फक्त सकारात्मक बाबीकडेच लक्ष द्यायला हवं आणि जे काही चुकीच होत आहे किंवा जिथे सुधारणेची गरज आहे त्यावर फार लक्ष द्यायची गरज नाही. कारण असे केल्याने आपण उगाच नकारात्मक उर्जेला वाव देत असतो आणि त्यामूळे सकारात्मक बदल होत नाही. किंवा जे सकारात्मक आहे तेच अंगीकृत करायचं आणि बाकी गोष्टींबाबत बोलायच सुद्धा नाही. मग या धर्तीवर वर तर ओसामा बिन लादेन आणि हिटलर यांच्या पण फक्त सकारात्मक बाबींकडेच बघायला हवं आणि त्यांच्या नकारात्मक बाबींबद्दल चर्चा पण नको व्हायला.

पण प्रश्न हा आहे की नेहमी-नेहमी सकारात्मक गोष्टींचा इतका आग्रह का असावा ? सहजरीत्या वस्तूस्तिथी ज्याप्रकारे अस्तित्वात आहे तिला त्याचप्रमाणे स्विकारल्या का जात नाही ? किंवा सकारात्मक आणि नकारात्मक अशी नवीन वर्गवारी तयार करून एका विशिष्ट वर्गातील लोकांना आणि त्यांचा प्रश्नांना का डावलले जाते ? 

कुठलेही रचनात्मक कार्य करायचे असल्यास त्या कामाबद्दलच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. दोन्ही बाजूंचा सखोल अभ्यास न करता आपण समोर जाऊ शकत नाही. आपण कुठे कमी पडतो आणि आपल्याला नेमकी कुठे सुधारणा करायची आहे हे त्याशिवाय कळणार नाही. त्याचप्रमाणे संघर्ष(नकारात्मक) आणि निर्माण(सकारात्मक) या दोन्ही प्रक्रिया नेहमीच हातात हात मिळून सोबत जात असतात व बहुतांश वेळा संघर्ष ही प्रक्रिया निर्माण या प्रक्रियेसाठी समाजात नवीन जागा तयार करत असते. पण हल्ली संघर्ष वगैरे सगळं गौण झालं आहे. आपण समाज आणि देश म्हणून कुठेतरी कमी पडत आहोत किंवा काहीतरी चूक होत आहे याचा स्वीकार करण्याची इच्छाशक्तीच आपण विसरून बसलो आहे.  त्यामुळे होणार्‍या चुकांना सुधारणे हा प्रश्नच निर्माण होत नाही. सगळ्यांना सकारात्मक नव-नवीन बाबी निर्माण करण्याची ओढ लागलेली आहे त्यामुळे संघर्षातून प्राप्त होऊ शकणार्‍या गोष्टींकडे सर्वांचे दुर्लक्ष होत जात आहे. भारत देशाला स्वातंत्र्य हे संघर्षातूनच मिळाले आहे हे आपण इथे विसरून जाता कामा नये. संघर्ष, निदर्शनं हे आपल्याला कितीही नकारात्मक वाटत असेल तरी ते बहुतेकदा लोकांच्या हिताचेच  असते.

आम्ही फक्त सकारात्मक-सकारात्मक खेळू, नकारात्मक बाबींबद्दल बोलायचं नाही, लोकांकडून छान ते घ्यायचं आणि वाईट ते सोडायच असं बोलणं हा शुद्ध गोड-गोड वाटणारा पोरकटपणा आहे आणि यातून उथळ गोष्टींशिवाय काहीच साध्य होत नाही. त्यामुळे वस्तुस्थितीला असेल त्या स्वरुपात स्वीकार करून त्याबद्दल चर्चा करणे, लिहिणे आणि आवश्यक तो बदल घडवून आणणे हे “सकारात्मक आणि नकारात्मक” अशी वर्गवारी तयार करण्याएवजी कधीही चांगलेच.

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...