आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे. गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो(शहर किंवा गाव), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा, आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की.
एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा एखाद्या
व्यक्तीने जीवनात किती यश संपादन केले याचा विचार होत असतांना त्याला अवगत असलेले
कौशल्य, ज्ञान आणि मिळवलेले गुण याचाच नेहमी विचार केला जातो. तो व्यक्ति राहतो
कुठे, किती पैसे कमावतो, कुणासोबत
उठतो-बसतो यावरून त्याचे समाजातील स्थान आणि तो व्यक्ति किती यशस्वी आहे हे मोजले
जाते. पण त्या व्यक्तीने हे सर्व कौशल्य आणि यश कुठल्या परिस्थितीत मिळवलेले आहे
याबद्दल कधीच बोललं जात नाही आणि त्याचा विचार पण केला जात नाही. सर्वांना कधीच
एकसारख्याच परिस्थितीला सामोरे जावं लागत नाही. दररोज वर्तमानपत्र वाचणार्याला
साहजिकच जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा बर्यापैकी अंदाज असतो व त्याचे सामान्य
ज्ञान पण बरे असते. वर्तमानपत्र ही शहरात राहणार्या लोकांसाठी ही एक गरज आहे. पण
हेच वर्तमानपत्र गावातील किंवा दुर्गम भागातील व्यक्तीसाठी एक चैनीची वस्तु असते, व ती सर्वसामान्य लोकांच्या घरी दिसून येत नाही. साहजिकच आहे की बहुतांश
लोकसंख्या वर्तमानपत्रापासून वंचित राहते व सोबत येणार्या ज्ञानापासून पण. एका साध्या
वर्तमानपत्राचा इतका मोठा परिणाम होत असेल तर इतर महत्त्वाच्या बाबींनी किती मोठा
फरक पडत असेल याचा अंदाज बांधणे हे अशक्यच. कारण कुणासाठी कुठली बाब महत्त्वाचची
असेल हे आपण कधीच ठरवू शकत नाही. ३-४ पिढ्यांपासून शिक्षणाची परंपरा असलेल्या
घरातील लोकांना साहजिकच शिक्षण क्षेत्राची माहिती ही कितीतरी पटीने जास्त असते.
त्या घरातील लोकांची तुलना आपण जेमतेम या पिढीपासून सुरू झालेल्या घरातील लोकांशी
करूच शकत नाही. हेच साहित्य, क्रीडा,
कला, संशोधन, मनोरंजन इत्यादि साठी
लागू होतं. तुम्हाला साहित्याबद्दल माहिती नाही, खेळाबद्दल
माहिती नाही यासाठी कमी लेखलं जातं. ज्यांना वर्तमानपत्र वाचने हे भाग्याचे काम
वाटते त्यांना असल्या मोजपट्टीत बसवणे हा आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचा मोठा
मूर्खपणा आहे. चारचाकी नसलेल्या व्यक्तिला चारचाकी चालवता येत नाही यासाठी हिणवणे
यात काय शूरपणा ? सर्व बाजू जमेच्या असतील तर काम करणे किंवा
यश संपादन करणे हे नेहमीच सोपं जातं. त्यामुळे कुठल्या परिस्थितीवर मात करून यश
संपादन केले आहे याला जास्त महत्त्व असले पाहिजे.
गेल्या काही वर्षात “सेव मेरीट, सेव
नेशन” या चळवळीला बराच वेग येतांना दिसतोय. म्हणजेच काय तर गुणवत्ता असलेल्या
लोकांना वाचवा म्हणजे देश वाचेल. याचा अर्थ असा की जे आधीच हुशार आणि गुणवत्त आहे
त्यांना त्यांची गुणवत्ता वाढवायला आणखी प्रयत्न करा व त्यांना अतिरिक्त अधिकार
द्या. भारत देश हा आधीच विविध प्रकारच्या वर्गवारीने ग्रासलेला आहे त्यात आणखी एका
वर्गवारीची भर घालणे कितपत बरोबर हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. समजा आपण हे केले
सुद्धा तर काय नेमके काय होईल ? आधीच विविध स्वरुपात
असेलेल्या होणार्या फायद्यांमद्धे आणखी काही फायदे फक्त काही निवडक लोकांसाठी
जोडले जातील व वंचित असलेले हे अनंत काळासाठी वंचितच राहतील. यामुळे समाजात आधीच
मोठी असलेली आर्थिक विषमतेची आणि सामाजिक विषमतेची दरी आणखी मोठी होत जाणार, जी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बाधा ठरेल.
https://www.esakal.com/authors/aakaash-nvghre
Comments
Post a Comment