दिवसेंदिवस माणसाचे जीवन खूप सोयिस्कर होत चालले आहे. जवळपास सर्वच गोष्टी अगदी सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने पूर्वी विविध प्रकारच्या कामातील रोमांच आता अनुभवता येत नाही. त्यामुळे तो रोमांच आपण चित्रपट किंवा संगणकीय खेळांमध्ये शोधत असतो. संगणकीय खेळांचा प्रसार हा विशिष्ट वयोगटांत मर्यादित असतो. पण चित्रपटाचे तसं नाही, अगदी लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच लोकं चित्रपट बघत असतात. म्हणूनच चित्रपट आणि चित्रपटसृष्टी हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीतरी आपण एखादा तरी चित्रपट बघतोच.
आजकाल भारतीय चित्रपट किवा इतर चित्रपट सुद्धा बर्यापैकी
व्यावसायिक झालेले आहे. त्यामुळे त्यात सत्याचा असत्यावर विजय,
न्यायाचा अन्यायावर विजय, प्रचंड मारामारी वगैरे याप्रकारचे
चित्रपट भरपूर बनवले जातात. याप्रकारचे चित्रपट बघतांना बहुधा आपण सर्वच श्रोते
सत्याची किंवा न्यायाची बाजू घेतो आणि नायक कश्याप्रकारे खलनायकावर मात करू शकतो
याबद्दल सारखा विचार करत असतो. बहुधा नायकाची किंवा सत्याची बाजू घेण्याचा कुठलाच संबंध
हा श्रोत्यांच्या व्यक्तिमत्वाशी दिसून येत नाही. मी स्वतः प्रत्यक्ष जीवनात
कितीही वाईट व्यक्ति असलो तरी मी चित्रपटात मात्र नायक(Hero)
यांचीच बाजू घेतो. अगदी तीन-चार खून केलेला, चोरी-लबाडी
करणारा व्यक्तिसुद्धा चित्रपट बघतांना अमिताभ बच्चन, सलमान
खान आणि अक्षय कुमार असल्या नायकांचीच बाजू घेत असतो. बहुतेक नैसर्गिक रित्या मानव
असाच असावा जो नेहमी पडत्याची, सत्याची आणि कमजोर असलेल्यांशी
सहानुभूती दाखवत त्यांची बाजू घेतो किंवा घेण्याचा प्रयत्न करतो. याच धर्तीवर
अतिमानवांच्या(Superheroes) चित्रपटांना आणि त्यांना संपूर्ण
जगातील लोकं अगदी डोक्यावर घेऊन मिरवत असतात(मी सुद्धा),
त्यांचे विविध उत्सव सुद्धा साजरे केले जातात. या प्रकारात हे सर्व पात्र काल्पनिक
आहे, हे विसरून जाता कामा नये.
नायक, अतिमानव हे सत्याच्या आणि न्यायाच्या
बाजूने उभे असतात त्यामुळे साहजिकच आपण त्यांची बाजू घेत असतो. पण हेच आपण आपल्या
खर्या-खुर्या असलेल्या जीवनात का करत नाही ? का आपण कुठलीच
बाजू घेत नाही ? चित्रपटातील नायकाप्रमाणे सत्याच्या आणि
न्यायाच्या बाजूसाठी का आपण काहीच बोलत नाही ? किंवा कुणी
याप्रकरचे प्रश्न केल्यास का आपण त्या व्यक्तीला मूर्खात काढायचा प्रयत्न करत असतो
? आपली सहानुभूती ही फक्त काल्पनिक जगांपूर्तीच मर्यादित आहे
का की खर्या विश्वात पण त्याची काही झलक बघायला मिळेल ?
समाजातील नागरिक म्हणून किंवा एक मनुष्य म्हणून आपल्या पण
काही जबाबदर्या असतात ज्या आपण गरज असेल तेव्हा पार पाडायला पाहिजे. स्वतः सोबत
किंवा समाजात काही चुकीचे घडत असेल तर त्याबद्दल बोलणे हे आपले कर्तव्य असते. जे
आपण करत नाही आणि कुणीतरी व्यक्ति येऊन ते करेल याची सतत वाट बघत असतो. या
सवयींमुळे आपण स्वतःचे खच्चीकरण तर करून घेतोच पण सत्यासाठी किंवा न्यायासाठी उभे
राहण्याच्या स्वतःच्या शक्तीचाही आपल्याला विसर पडत असतो. आपल्या अश्या या भ्याड
वागणुकीमुळे कुणालातरी संधी प्राप्त होते व एका नायकाचा जन्म होतो व त्यानंतर अगदी
छोट्या-छोट्या कामांकरितासुद्धा आपल्याला नायकाची गरज भासत असते. अश्या या सर्व
घडामोडींमुळे आपण स्वतःचे अस्तित्व विसरून जाऊन नायक म्हणेल ती पूर्व दिशा हे
मानून बसतो. आणि नेहमी हे नायक सज्जन असतीलच याची काहीच शाश्वती नसते आणि
त्यांचामागे मग संपूर्ण समाज कशाप्रकारे एका संकटात ओढल्या जातो हे तर आपल्या
देशात अगदी ठळकपणे आज दिसून येत आहे.
आपण सर्वांनी कुणीतरी येऊन आपल्याला मदत करेल याची अपेक्षा
न बाळगता आपआपल्या जबाबदर्या पार पडल्या तर बहुतेक समाजाला नायकाची किंवा
अतिमानवाची गरज भासणारच नाही. प्रत्येक व्यक्ति ही एक नायक आहे व ती व्यक्ति एका
नायकाप्रमाणे प्रभावी काम सुद्धा करू शकते. त्यामुळे स्वतःला नायक समजून आपली
जबाबदारी पार पाडणे हेच आपल्या आणि समजाच्या हिताचे आहे.
Comments
Post a Comment