या धकाधकीच्या आणि प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात आपण काय करतोय
? का करतोय ? आणि आपल्या कृतीचा स्वतःवर आणि समाजावर काय परिणाम होतोय याबद्दल विचार करायला वेळचं उरत नाही. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा आणि विकासाचा उपयोग हा बऱ्याचदा विविध स्वरूपातील वर्गवारीला बळकटचं करण्या करीता होत असतो.
जवळपास दहाएक वर्षाआधी आमिर खान एका घड्याळीच्या जाहिरातेत खुद्द एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक(Managing
Director) असून सुद्धा संगणक दुरुस्ती चे सोपी आणि सामान्य काम हसत हसत करतो आणि त्याबद्द्दल विचारपूस केल्यावर तो म्हणतो कि "काम लहान किंवा मोठ नसतं , काम तर काम असतं."
आणि त्यासाठी बराच भाव खाऊन जातो. पण वास्तव हे आहे काय ? तर कदाचित याचे उत्तर सगळ्यांचा तोंडून नाही असेच निघेल. माझे काम, माझा व्यवसाय आणि माझे क्षेत्र कशाप्रकारे महत्त्वाचे आहे आणि माझ्या किंवा माझ्या कामाच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा गाडाचं चालणार नाही या स्वरूपात प्रत्येक व्यक्ती हा त्याचा कामाचा आणि त्याचे महत्त्व याबद्दल चा गाजावाजाचं करत असतो.
पण हे करत असताना माझेच काम श्रेष्ठ आणि बाकी सर्व दुय्यम हि वर्गवारी जन्माला येत आहे याचा अंदाज सुद्धा आपल्याला नसतो.
भारत सारख्या देशात जिथे आधीच धर्म, समाज, जात, पंथ आणि विविध न दिसणाऱ्या वर्गवाऱ्या आहेत त्यामध्ये आणखी एक कामाच्या स्वरूपातील नवीन वर्गवारी तयार करायची कि नाही किंवा हि नवीन वर्गवारी समाजाला परवडेल काय ? याबद्दल पण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
अभियांत्रिकेच्या काही विशिष्ट महाविद्यालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी विशिष्ट गुन लागतात. अर्थातच त्याप्रकारचे गुण मिळवणे हीसुद्धा आत्ताच्या घडीला तारेवरची कसरत होऊन बसलेली आहे. त्यामुळे प्रवेश मिळवणारे मोजकेच असतात आणि तिथूनच आम्ही निवडक विशिष्ट दर्जाचे आणि उरलेले ज्यांना प्रवेश मिळालेला नाही ते दुय्यम असा शिक्षण ते तुम्ही करणारे काम या वर्गवारीचा प्रवास सुरु होतो. सुरुवातीला चलन अस्तित्वात यायच्या आधी वस्तुविनिमय करून व्यापार चालायचा, त्यामुळे कुठले तरी एक काम किंवा काम करणारा कारागीर हा श्रेष्ठ किंवा दुय्यम असा भेदभाव होत नसे कारण प्रत्येक व्यक्तीचे काम आणि त्याला अवगत असलेली कला हे इतर प्रत्येक व्यक्तीच्या कामात येत असे. पण चलनाच्या उदयानंतर हे चित्र पालटले आणि कलेची व अवगत असलेल्या कौशल्याची समाजावर प्रभुत्व असलेल्यांनी विविध वर्गवारीत विभागणी केली आणि यात इतर विविध सामाजीक आणि वैयक्तिक बाबींची भर ती होतीच.
उदाहरणार्थ, एक गाव घेऊ बऱ्याच दुर्गम भागात वसलेले. साहजिकच पिण्याचे पाणी, रस्ते, पूल यासारख्या मूलभूत सोयींचा अभाव. गावालगत असलेल्या नदीला दर पावसाळ्याला पूर येऊन हे गाव मुख्य प्रवाहापाससून तोडले जाते आणि लोकांना बऱ्याच गैरसोयीचा सामना करावा लागतो.
एकदा पूर ओसरला कि कपडे वाटप,धान्य वाटप,
रोग निदान शिबीर वगैरे प्रकार सुरु होतो आणि हे वर्षानुवर्षे सुरु असते, आणि अश्या प्रकारच्या कामाचा उदो उदो करून बरीच मंडळी बक्षिसे,
सन्मान, पुरस्कार वगैरे मिळवून घेतात.
आता याच गावात एक व्यायसायिक कंत्राटदार गावालगतच्या नदीवर पूल बांधायचे काम शासनाकडून मिळवून घेतो. पुढील वर्ष-दोन वर्षात तो पुलाचे काम पूर्ण करतो.
पुलाच्या बांधकामात गावातील काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि बऱ्याच पिढ्यांपासून पुराचा तडाखा सोसत असलेल्या गावाला तो या जाचापासून मुक्त करतो. आता पुराचा हा प्रश्नच मुळासकट बंद होऊन जातो.
त्यामुळे पुरामुळे नेहमी उभे टाकणारे प्रश्न आता येत नाही.
पुराच्या वेळी वैद्यकीय आपत्ती असेल तरी दवाखान्याचा मुख्य ठिकाणी कधीही जाता येत आणि कुठलेच काम रस्त्याचा अभावी थांबत नाही.
पण वर्षानुवर्षे एकाच कामाचं(प्रामाणिक/अप्रामाणिक)
भांडवल करून सामाजिक पुरस्कार मिळवणार्यांना नेहमीच आपण डोक्यावर घेऊन मिरवतो आणि कंत्राटदार(प्रामाणिक/अप्रामाणिक) ज्याने समस्यांचे मुळचं नष्ट केले, त्याला मात्र नेहमी भ्रष्ट आहे, नीति आणि मूल्यांचा अभाव आहे वगैरे वगैरे बोलत असतो.
काम करून सुद्धा अश्या हिणवणाऱ्या वर्गवारीला सामोरे जावे लागणे हे कुठल्या प्रगत आणि सुशिक्षित समाजाचे लक्षण आहे ?
हे एक कोडंच आहे.
Comments
Post a Comment