Skip to main content

“शिक्षणवारी”

मी मुख्य नागपुर शहरापासून दहाएक किलोमीटर दूर राहतो आणि हे अंतर तसं बघितलं तर फार नाही आहे. अगदी माझ्या बालपणापासून दळणवळणाची साधने पण मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आधी एसटीचा लाल डब्बा, नंतर स्टार बस व सोबतीला आटोरिक्षा यांची बरीच रेलचेल सुरुवातीपासूनच असायची. अंतराबद्दल बोलायच झालं तर नागपूरमधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय माझ्या घरापासून अगदी ८०० मीटर अंतरावर आहे, वैद्यकीय महाविद्यालय ५ किंलोमीटर अंतरावर आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालय हे ८ किलोमीटर अंतरावर आहे. ही सगळी अंतरे सांगण्यामागचे कारण असे  की ही वेगवेगळी अंतरे आपल्याला फार वाटत नाही आणि इतक्या कमी अंतरामुळे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये खूप काही फरक पडणार नाही असा बहुतेकदा आपला समज असतो.

दहावीचा निकाल हातात येईपर्यंत डॉक्टर व्हायच असेल तर अकरावी ला प्रवेश घ्यायचा आणि अभियांत्रिकीकडे जायच असेल तर तंत्रविद्यानिकेतन(Polytechnic) ला प्रवेश घ्यायचा यापलीकडे काहीच माहित नव्हतं. अभियांत्रिकी ला राज्यस्तरीय महाविद्यालये वेगळे, राष्ट्रस्तरीय वेगळे आणि नंतर आई.आई.टी(IIT) वेगळे आणि त्यासाठी दिल्या जाणार्‍या परीक्षा पण वेग-वेगळ्या हा प्रकार कधी कानावर पडलाच नव्हता. याच धर्तीवर इतर विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाबदद्ल पण आम्ही अडाणीच होतो. त्यामुळे माझ्या वर्गातील आणि आमच्या सोबत असणारी इतर शाळेतील विद्यार्थी हे वर दिलेल्या दोन पर्यायांपैकी एकाकडे वळले. अवघ्या वीस-तीस मिनिटांच्या अंतरावर सर्व प्रकारची महाविद्यालये असून सुद्धा असा प्रकार घडत असेल तर इतरत्र ग्रामीण आणि दुर्मिळ भागात काय अवस्था असेल याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो.

माहितीच्या अभावी बर्‍याच लोकांना समोर दिसत असलेल्या दोनच क्षेत्रात जावे लागते. स्वतः ला काय करायचं हा तर दूरचा प्रश्न होऊन बसतो. त्यामुळे फार लोकं समोर जाऊन उच्च शिक्षण घेत नाही घेतले तरी ते पालकांच्या दबावात घेतले जाते आणि कौशल्य मात्र अवगत करता येत नाही.

जीवनाची खरी कसोटी ही या टप्प्यापासून सुरू होते. आपण उच्च शिक्षित नसल्याने साहजिकच आपल्याला महत्त्वपूर्ण आणि मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळत नाही. आपले उच्च शिक्षित मित्रमंडळी नसल्याने शिफारस पण आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण होतो त्याच सामाजिक वर्गात आयुष्यभर जगत राहतो. शिक्षणा आपला राहाणीमानाचा दर्जा उंचावत नाही आणि एकंदर समाजातील आपले स्थान अबाधितच राहते. दोन-तीन दशकाआधी चित्र अगदी याच्या उलट होतं. उच्च शिक्षण घेतलेलं असेल तर हमखास छान नौकरी मिळायचीच, आणि सहजरीत्या सामाजिक आणि आर्थिक शिडी चढता येत असे. तेच इतर व्यवसाय क्षेत्रात पण होत असे. कष्ट केले आणि व्ययसायाशी प्रामाणिक असलो की बहुतेकदा यश हाती लागायचचं.  

न्यू यॉर्क टाइम्स ने प्रकाशित केलेल्या “क्लास मॅटर्स” या पुस्तकात उच्च शिक्षणामुळे होणार्‍या वर्गवारीचे उदाहरणासहित दाखले देण्यात आलेले आहेत . उच्च शिक्षित घरातील मुलांचा कल उच्चशिक्षणाकडे नेहमीच जास्त असतो. उच्च शिक्षणामुळे मोठ्या खात्यातील नोकर्‍या हमखास ठरलेल्या असतात, नाहीच मिळाली नौकरी तरी आधीच उच्च शिक्षित घरातून असल्याने आणि नंतर अश्याच वर्तुळात असल्याने शिफारस मिळणे अगदी सोपं होतं. त्यामुळे एखादी कमी शिक्षित व्यक्ति एखादे काम करायची कुवत जरी ठेवत असेल तरी त्याची वर्णी लागत नाही. अश्याप्रकारे सर्व महत्त्वाची आणि मोठी कामे ही एका विशिष्ट वर्गाकडे एकवटली जातात आणि इतर लोकांना सामाजिक गतीशीलतेसाठी (Social Mobility) फार वाव राहत नाही.

सध्या वर्तमान काळात बहुतेक सर्वच महत्त्वाची संसाधने ही काही लोकांकडे एकवटली जात असताना आपण बघत आहो . याची बरीच ताजी उदाहरणे तुम्हाला दूरध्वनी, संरक्षण, रेल्वे आणि इतर ठिकाणी दिसून येतात. या सर्व प्रकारामुळे सामाजिक गतीशीलता ही दिवसेंदिवस खूप कठीण होत चालली आहे. पूर्वीप्रमाणे आता सामाजिक गतीशीलतेचे विविध मार्ग उरलेले नाहीत, त्यामुळे आपण असलेल्या सामाजिक स्तरातून स्वतः ला प्रामाणिकपणे बढती मिळवून द्यायची असेल तर  घेणे आणि ते ही उच्च शिक्षण मिळवणे याशिवाय दूसरा पर्याय सद्यस्थितीत तरी दिसत नाही.

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...