सामाजिक काम म्हणजे काय ? माझ्या मते जगात सामाजिक काम नावाची वस्तू वगैरे काही नसते. असते ते फक्त काम, आवडते किंवा नावडते आणि प्रत्येक कामातून आपण समाजातील कुठल्या तरी व्यक्तीला वस्तू किंवा सेवा पुरवीत असतोच. मग तो सकाळी वर्तमान पत्र वाटणारा असो किंवा कार्पोरेट कंपनीतला एक आय.टी इंजिनिअर असो. मी शेतकर्याचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आणि जो शेतकरी अक्ख आयुष्य इतके काबाड कष्ट करून तुम्हा आम्हाला अन्न पुरवतो, त्याला काय म्हणाव ? जात-पात, धर्म-पंथ, वर्णभेद हि असमानता काय कमी होती कि आता आपण कामात पण असाच भेदभाव करायला लागलो आहे. “द सेल्फिश जिन” या पुस्तकात रिचर्ड डॉकिन्स लिहतो कि “या पृथ्वी वरील एक एक जीव हा भयंकर स्वार्थी आहे, आणि या स्वार्थीपणामुळेच आपले अस्तित्व आहे.” आपले पूर्वज स्वार्थी नसते तर आपण आज सामाजिक कामाबाद्द्दल बोलायला जिवंत नसतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कामात स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापोटी तो/ती ते काम करत असतो. आता हा स्वार्थ नेहमी व्यक्तीनुसार बदलत असतो. हुशार स्वार्थी लोक निसर्ग, आरोग्य, शेती वगैरे महत्वाच्या क्षेत्रा...